जेवणात कांदा नाही तर कोणी मरत नाही ! बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान !!
पिंपरी-चिंचवड ( प्रतिनिधी) : कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार आहे का? मेलं आहे का? असा प्रश्न करत त्यांनी नागरिकांपुढे पर्याय ठेवला आहे. कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे आणि लसूण खायचा नसेल तर मुळा खा, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल आहे. मी सरकारमध्ये असलो तरी हे सरकार नालायक प्रवृत्तीचे आहे. हे सरकार कधी – कधी नामर्दासारखं वागतं. त्यांनी सुधारलं पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. ते माझं कर्तव्य आहे, असं देखील खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले आहेत. आमदार बच्चू कडू हे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या वक्तव्याचं समर्थन बच्चू कडू यांनी केल आहे. दादा भुसे यांनी कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, असं वक्तव्य केलं होतं. याच प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे. ते पण खायचं नसेल तर मुळा आहे. सरकार नामर्दासारखं वागतं कधी- कधी, ही नामर्दांगी आहे. सत्ता टिकावी म्हणून हे सरकार ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार करत आहे. पण, पिकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही. मी सरकारमध्ये असलो तरी ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधारली पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हे माझं कर्तव्य आहे. भाव वाढले म्हणून हस्तक्षेप करता. मग भाव कमी झाल्यास हस्तक्षेप का करत नाहीत? असा प्रश्न ही त्यांनी विचारला.