श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमंदिरे दुमदुमली भाविकांचा महापूर
नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या श्री शंकराच्या महत्त्वाच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती हर हर महादेव या गजरात असंख्य भावी श्री शंकराच्या पिंडीला नमन करीत होते.नासिक मध्ये गंगाघाटावर असलेल्या पुरातन व प्रसिद्ध अशा कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर, पाताळेश्वर, बाणेश्वर, नारोशंकर अशा विविध महादेवाच्या मंदिरांमध्ये श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि.२०) पहाटेपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने गोदाघाटचा परिसर दुमदुमला होता. दूध, बेल, बेलफळ, हार फुले व तांदूळची शिवामठ अर्पण करून महिला मनोभावे पूजन करत होत्या. बेल पानाने दिवसभर महादेवाला अभिषेक सुरू होता. तर, व्रतधारी भाविक रामकुंडात स्नान करून शिव मंदिरात पूजेसाठी जात असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रामकुंड परिसरातील प्राचीन व प्रसिद्ध असलेल्या भगवान कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी राज्यासह जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी कपालेश्वर संस्थानच्या वतीने श्रावण महिन्यात दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कपालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर शिवपिंडीवर सोमवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास अभिषेक, रुद्राभिषेक व पूजा अर्चा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सोमवती आमावास्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र याच दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. परंपरेनुसार चांदीच्या पंचमुखी महादेव मुखवट्यांची पालखी काढली जाते. दुपारी कपालेश्वर मंदिरात मुखवटा आणल्यानंतर दुपारी ४.३० वा. पालखी सोहळा सुरू केला गेला. पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली तेथून पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर सायंकाळी सातला पालखी आली. त्यानंतर रामकुंडावर दूध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात आला. महाआरतीनंतर पंचमुखी मुखवटा मंदिरात नेण्यात आला.