अश्लील शेरेबाजी-भोवली , डॉक्टर तरुणीने थेट पोलिसाना ११२ वर फोन लावला,
रोडरोमिओला जन्माची अद्दल घडली !
छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी ) : शहरातील कनॉट प्लेस परिसरामध्ये जेवण करण्यासाठी पायी जाणाऱ्या दोन डॉक्टर तरुणींची भर रस्त्यात छेड काढून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोडरोमिओला ११२ च्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. याप्रकरणी रोडरोमिओविरोधात सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोरख कांबळे (वय ३० राहणार इंदिरानगर गारखेडा परिसर) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमिओचं नाव आहे.
दरम्यान, २३ वर्षीय डॉक्टर तरुणी तिच्या मैत्रिणींसह सेवन हिल उड्डाणपुलाकडून कनॉट भागामध्ये जेवण करण्यासाठी निघाली. त्यावेळी त्या कॅरट परिसरामध्ये असलेल्या एका सुपरमार्केट समोर येताच दुचाकी क्रमांक एम एच २० जि.जी ३९ ३६ यावरून जाणाऱ्या एका तरुणाने या डॉक्टर तरुणींना पाहून अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. तो अश्लील इशारे करू लागल्याने घाबरलेल्या तरुणींनी तात्काळ डायल ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी संदीप कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कांबळेविरोधात सिडको पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस हवालदार राठोड करीत आहेत.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरुणी, महिलांनी घाबरून न जाता तात्काळ डायल ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती द्यावी. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचतील. यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळता येतील, असं आवाहन सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी केले आहे.