पुणे बंगळुरू महामार्गावर गाडीचा टायर फुटून अपघात, तीन ठार, चार जखमी
सातारा : पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटून उभ्या असणाऱ्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळून झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाले. जखमींना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात एवढा जोरदार होता की यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर इतर चारजण गंभीर जखमी झाले. एक महिला अत्यवस्थ आहे. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अत्यवस्थ महिला व जखमींची नावे उपलब्ध झाली नाहीत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला हटवण्यात आले. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर वाहन उभे करून प्रवासी घेणाऱ्या गाडीचा चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.