सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस पडू दे, पालकमंत्री दादा भुसे यांची प्रार्थना
नाशिक ( प्रतिनिधी ) : नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 44 महसुली मंडळात 21 दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून पुढील दोन दिवसात ही संख्या 54 पर्यंत पोहोचणार आहे.पालकमंत्री दादा भुसे यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून पिके करपू लागली आहेत. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पाऊस नसल्याने सिन्नर तालुक्यातील 41 गावांमध्ये पेरण्या होऊ शकल्या नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने तेथे दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 772 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ 380 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची ही मोठी तूट निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस ही तूट भरून काढेल, त्यामुळे धरणे ही भरतील, अशी आशा पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्याचे तीन महिने सरूनही दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर टंचाई संकट गडद होत चालले आहे. यापुढील काळात पाऊस झालाच नाही तर उपलब्ध पाणीसाठा जुलै 2024 पर्यंत कसा पुरवता येईल, त्यासाठी आतापासूनच काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर चर्चा करण्यात आली. पाणी कपात सध्या सुरू असलेल्या पाण्याचा अपव्यय याबाबत ठोस चर्चा व निर्णय घेण्यात येईल. परंतु गेल्या काही वर्षात परतीच्या पावसाने जिल्हा वासियांना दिलासा दिला असल्याचे सांगत यावर्षी देवाने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस पाडावा, अशी विनंती पालकमंत्री भुसे यांनी केली आहे.
पीक विमा कंपन्यांनी सरसकट सर्व्हे करावा...
दरम्यान दादा भुसे म्हणाले की पिक विमा कंपन्यांनी सरसकट सर्वे करावा, त्याचबरोबर जिल्ह्याबाहेर चारा जाणार नाही. याची काळजी घ्या तसेच जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असून गुरे खरेदी विक्रीवर तूर्तास निर्बंध लादण्यात येत असल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पिक विमा कंपन्यांनी तात्काळ पंचनामे करावेत, यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले पण यश नाही. तसेच कांदा प्रश्नावर ते म्हणाले की, नाफेड बाजारात उतरावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुराव्याची तयारी करण्यात आली आहे. आगामी काळात रोजगार हमीच्या कामांना तात्काळ मंजुरी देऊन मागील त्याला रोजगार द्या, असे आवाहन शासकीय यंत्रणांना करत ज्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवेल त्या ठिकाणी टँकरची मागणी झाल्यास मंजुरी देणार असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.