शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा
लातूर ( प्रतिनिधी ) : सध्या राज्यात पावसानं दडी मारली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. लातूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकड पिकांना देण्यासाठी विहीरीचे पाणी आहे, ते शेतकरी पिकं जगवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशातच महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नाही. याप्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन, अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
लातूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांना सांगितली. औसा येथील महावितरणच्या बैठकीत शेतकऱ्यांनी याबाबत सांगितले. त्यानंतर अभिमन्यू पवार यांनी बैठकीतूनच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण अधिकार्यांना खडे बोल सुनाववे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन असा सज्जड इशारा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.