रिपोर्टर 01-09-2023 16:54:58 2507
नाशिक ( प्रतिनिधी ) : नाशिककरांना चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात भेसळीच्या संशयावरुन एकूण रुपये 59 हजार 450 रुपयांचा 224 किलोग्रॅमचा पनीर आणि मिठाईचा साठा जप्त करुन नष्ट करण्यात आला. या कारवाईने पनीर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक शहरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अन्न पदार्थात भेसळ करण्यात येत आहे, अशा ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनास शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक शहरातील देवळाली कॅम्प परिसरात पेढीची तपासणी केली असता अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठविल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर पेढी विनापरवाना पनीर उत्पादन करत असल्याचे आढळले. पनीर भेसळीच्या संशयावरुन अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित 37 हजार 730 रुपये किंमतीचा 171.5 किलोग्रॅम पनीरचा साठा जप्त करण्यात आला.
देवळाली कॅम्प परिसरातच एका स्वीट उत्पादक पेढीची तपासणी केली असता या पेढीत विनापरवाना अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी इत्यादी मिठाईचा साठा साठवल्याचे आढळले. भेसळीच्या संशयावरुन या पेढीतील अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित 21 हजार 720 रुपये किंमतीचा 53 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला एकूण 59 हजार 450 रुपयांचा 224 किलोग्रॅमचा साठा हा नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण 3 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
वेळोवेळी आवाहन, तरीही...
दरम्यान, नाशिक विभागात काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दूध तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वेळोवेळी अनेक स्वीट मार्टवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते. अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थात भेसळ करु नये. तसे करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.