मुंबईत प्लास्टिकविरोधी कारवाईतून २४ लाख रुपये दंड वसूल
मुंबई ( प्रतिनिधी ) : मुंबई महानगरपालिकेने २१ ऑगस्ट रोजी मुंबई शहर व उपनगरांमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत १४ दिवसांमध्ये केलेल्या कारवाईतून महानगरपालिका प्रशासनाने २४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच एकूण १०४.६५ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त केले. महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी ५९७ दुकाने व आस्थापनांना भेटी देऊन एका दिवसात ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने ऑगस्टपासून प्लास्टिकबंदीची कारवाई पुन्हा नव्याने तीव्र केली आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे डबे, चमचे, वाट्या, ग्लास, वाडगे आदी विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणाऱ्यांवर, तसेच त्यांची विक्री करणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा केली जाणार आहे. प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.
२१ ऑगस्टपासून आतापर्यंत बाजारपेठा, दुकाने, आस्थापना, फेरीवाले आदी ठिकाणी सुमारे १२ हजार ४७५ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेने २४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. एकंदरीत २०२२ वर्षांपासूनचा अहवाल पाहता मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आजतागायत एक कोटी सात लाख ६० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या एकूण १० विभागांमध्ये पुरेशा मनुष्यबळाअभावी सोमवारी कारवाई केली नाही. मुंबई महानगरपालिकेकडून २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ४९३ जणांविरुद्ध पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी विविध दुकाने, बाजारपेठा व आस्थापनांवर छापे टाकून एका दिवसात पहिल्या गुन्ह्याअंतर्गत १९ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.