किशोरी पेडणेकरांना अटकेपासूनचा दिलासा कायम,
11 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
मुंबई ( प्रतिनिधी ) : कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना यांना हायकोर्टानं पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र या दरम्यान चौकशीला हजेरी लावत त्यांना मुंबई पोलिसांना तपासांत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 11, 13 आणि 16 सप्टेंबर रोजी किशोरी पेडणेकरांना मुंबई पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीकरता हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान त्यांना अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयानं याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडीबॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या याचिकेला विरोध करताना पोलिसांनी स्पष्ट केलंय की,अधिकार नसतानाही महापौरांनी आपल्या बंगल्यावर बोलावून समितीला संबंधित कंपनीला कंत्राट देण्यास भाग पाडल्याची माहिती आहे.
किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.
वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
पेडणेकरांचा दावा
शिवसेनेत फूट पडल्यानंतरच उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्यामुळेच आपल्याविरुद्ध ही तक्रार करण्यात आली असून हा गुन्हा राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन दाखल केल्याचा पेडणेकरांनी याचिकेतून दावा केला आहे. तक्रारदार किरीट सोमय्यांचा विरोधी राजकारण्यांना लक्ष्य करण्याचा इतिहास जुना आहे. आपण एक माजी परिचारिका असल्यानं रुग्णालयातून निकृष्ट दर्जाच्या बॉडी बॅगच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्या होत्या. त्या खरेदी विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. व्हीआयपीएलला हे कंत्राट देण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा पेडणेकर यांनी याचिकेतून केला आहे.