आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी,निवडणुकीवर बहिष्कार
सांगली ( प्रतिनिधी ) : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत धनगाव (ता.पलूस) या गावाने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा आणि सर्व निवडणूकांवर बहिष्काराचा निर्णय मंगळवारी झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संपुर्ण गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवतिर्थावर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी धनगाव मधील तरूणाईने संयम आता संपल्याचे सांगत सत्तेला मतदार राजाची किंमत दाखवून देण्यासाठी धनगाव मध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धनगावच्या शिवतिर्थावर तशा आशयाचे निवेदन सकल मराठा तरूणांच्या वतीने सरपंच सतपाल साळुंखे यांना देण्यात आले. यावेळी सरपंच सतपाल साळुंखे, हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन दिपक भोसले, दत्ता उतळे, रविंद्र साळुंखे, कुमार सव्वाशे, शुभम साळुंखे, अरविंद साळुंखे, जयदीप यादव, आनंदराव उतळे, राज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.