मुंबईकराकडे आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंटचे नेतृत्व
मुंबई ( प्रतिनिधी ) : मुंबईकरांसाठी ही अतिशय अभिमानास्पद बातमी आहे. आता आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंटचे नेतृत्व मुंबईकराकडे असणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांमधील डिजिटल पेमेंटचे नेतृत्व मुंबईकर अनिवासी भारतीय उद्योजकाकडे आहे. अणूशक्तिनगर येथे लहानाचे मोठे झालेले अनिरूद्ध साने यांची ‘टेरा पे’ ही स्टार्ट अप कंपनी आज या क्षेत्रात २१० देशांत सेवा देत आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) व पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) यांच्यातर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या तीनदिवसीय जागतिक वित्त तंत्रज्ञान उत्सवाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अनिरुद्ध साने व त्यांच्या कंपनीचे अध्यक्ष रितेश पै यांच्याशी संवाद साधला. अनिरुद्ध साने यांचे शालेय शिक्षण, अभियांत्रिकी पदवी व व्यवस्थापन शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी नेरदलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथे ‘टेरा पे’ ही कंपनी स्थापन केली. ते कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य व्यवसाय अधिकारी आहेत. एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठविताना किंवा विदेशातून पैसे घेताना त्यात अनेक अडचणी असतात. मुळात या क्षेत्रात कमी कंपन्या असताना त्यातील बहुतांश कंपन्यांच्या व्यवहाराचे ‘सेटलमेंट’ होण्यासाठी १५ मिनिटे ते दोन तासांचा कालावधी लागतो. अनिरुद्ध साने यांची कंपनी मात्र मिनिटांच्या आत हे काम करते. याचे श्रेय ते भारतीयांनाच देतात.
एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठविणाऱ्या अन्य कंपन्या असतील. परंतु त्या सर्व विदेशी आहेत. आम्ही भारतीयांना घेऊन ही कंपनी सुरू केली व आज वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील अग्रणी १०० पैकी आहे. २१० देशांत व्यवसाय असला तरिही एकूण व्यवसायापैकी तब्बल २५ टक्के व्यवहार हे भारतातील आहेत. भारतातील मोठे निर्यातक, व्यापारी यांच्याऐवजी आम्ही लहान वैयक्तिक यूपीआय वापरणाऱ्यांना सेवा देत त्यांच्यासाठी जाळे उभे केले आहे. हे लहान वैयक्तिक सहसा ज्येष्ठ नागरिक असतात व ते दुकानात उभे असताना विदेशातील त्यांच्या आप्तजनांकडील पैशांवर अवलंबून असतात. त्यांच्यासाठी मिनिटभरात पैसे पोहोचविणारी टेरा पे ही एकमेव कंपनी आहे. भारतीयांना घेऊन उभी केलेली ही कंपनी असल्याने हे शक्य झाले आहे.’, असे साने यांनी सांगितले.
साने हे या कंपनीने संस्थापक असले तरिही, सध्या रितेश पै हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. रितेश पै हेदेखील मूळ गोव्यातील मराठी भाषिक आहेत. ‘यूपीआय व्यवहारांत भारत आता जगात तिसऱ्या स्थानी आला आहे. हे तिसरे स्थान देशाने फार अल्पावधीत गाठले आहे. त्यात भरपूर वाव असून लवकरच पहिल्या स्थानी जाऊ शकेल’, असा विश्वास पै यांनी व्यक्त केला. स्वच्छ, निखळ व १०० टक्के विनारोखीच्या व्यवसायासाठी अनिरुद्ध साने यांच्या कंपनीने १६ देशांशी सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये एनपीसीआयचादेखील समावेश आहे.