पश्चिम भागातील मतदार काळेंच्या मागे, पदाधिकाऱ्यांचा विश्वास.
राजगुरूनगर (वार्ताहर)मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले बाबाजी काळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी निवडणुकीच्या या महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मतदार हा बाबाजी काळे यांच्यामागे ठाम असल्याचा विश्वास यावेळी दिला आहे.
मुंबईच्या जनजीवनात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या या संघटनेचा पाठिंबा मिळाल्याने बाबाजी काळे यांच्या प्रचाराला नवा जोर मिळाला आहे. डबेवाल्यांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या रंगतदार संघर्षात आणखी नवा रंग भरला गेला आहे. मुंबईवरून राजगुरूनगरला येऊन पदाधिकाऱ्यांनी काळे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की, बाबाजी काळे हे जनसामान्यांच्या समस्या जाणणारे व त्यांच्यासाठी काम करणारे नेते आहेत. डबेवाल्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यातही त्यांनी अनेकदा योगदान दिले आहे, तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभी राहणारी ही संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी विठ्ठल सावंत, कैलास शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.