*प्रशासकीय व शैक्षणिककार्यात उत्तमकाम केल्या बद्दल कैलास पाचारणे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित*
राजगुरुनगर, (वार्ताहर) : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे निवृत्त प्रबंधक व खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
नुकताच रविवार (दि.१७) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरीयल हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशनच्या, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण २० मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) निवृत्त अधिकारी व यशदा संस्थेचे अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत असलेले शेखर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष संजय पवार, पुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश चौधरी, पुणे शहर अध्यक्ष प्रा.श्रीकांत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
खेड तालुक्यातील पाचारणेवाडी हे मूळ गाव असलेले कैलास पाचारणे यांचा जन्म कष्टकरी शेतकरी कुटुंबात झाला. तिन्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण येथून पूर्ण केले.
याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ग्रंथालय व्यवस्थापन डिप्लोमा, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ग्रीन हाऊस पदविका, डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट असे कोर्सेस पूर्ण केले.कला वाणिज्य महाविद्यालय, चाकण येथे जुलै १९८९ मध्ये रोजी सेवक पदावर सेवेस सुरुवात केली. सेवक, ग्रंथालय परिचय, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ लिपीक,मुख्य लिपिक या पदांवर पदोन्नती घेऊन १४ जुलै २०१४ रोजी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रबंधक पदाची जबाबदारी स्वीकारली.
सन २०१० मध्ये पी.के. टेक्निकल कॅम्पस या संस्थेची निर्मिती करून तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी मोलाचा सहभाग घेतला. तालुक्यातील जवळपास दहा संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास त्यांनी मदत केली.२०१८ मध्ये स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील यांच्या नावाने नवीन महाविद्यालय मिळवण्यास सुरु करण्यात मोलाचा सहभाग घेतला. सामाजिक प्रश्नांच्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलने यात सहभाग घेतला.
अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासक म्हणून पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य अनुदानित महाविद्यालयीन रजिस्टर फॉर्म विभागीय अध्यक्ष पद व महाराष्ट्र राज्याचे सदस्य पदाची जबाबदारीही समर्थपणे पेलली. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष पद भूषविले.
३१ मे २०२५ रोजी नियत वयोमानानुसार ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातून प्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झाले.
पाचारणे यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेऊन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापकीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. संस्थेच्या तीनही विद्यालयांमध्ये सुसंवाद व समन्वय साधण्यामध्ये पाचारणे महत्वाची भूमिका बजावत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, तीनही विद्यालयांचे मुख्याध्यापक यांनी कैलास पाचारणे सरांचे अभिनंदन केले.