भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे नजरा !
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेला आजपासून प्रारंभ
बुडापेस्ट (हंगेरी) : जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवालांच्या नियुक्तीने जागतिक स्पर्धेत मैदानाबाहेर भारताची सकारात्मक सुरुवात झाली असली, तरी आज, शनिवारपासून प्रत्यक्षात ट्रॅकवर सुरू होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कौशल्याची खरी कसोटी लागेल. या स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असतील.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करणाऱ्या नीरजला आतापर्यंत जागतिक स्पर्धेतील सुवर्णयशाने मात्र कायम हुलकावणी दिली आहे. अखेरच्या अमेरिकेतील स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नव्या हंगामात यापूर्वीच सुवर्णयश संपादन केलेला नीरज या वेळी निश्चितपणे सुवर्णपदकाच्या शर्यतीत असेल. नीरजने येथे सुवर्णपदक मिळवल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा क्रीडापटू ठरेल. यापूर्वी अशी कामगिरी केवळ नेमबाज अभिनव बिंद्राला करता आली आहे. बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात २००६च्या जागतिक स्पर्धेत आणि त्यानंतर २००८च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.