G20 शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज;
कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : जी 20 शिखर परिषदेचा (G20 Summit) महामेळा भारतात भरणार आहे. या महामेळ्याचं आयोजन राजधानी दिल्लीत केलं जाणार आहे. त्यासाठी देशाची राजधानी सज्ज झाली आहे. 9-10 सप्टेंबरला जी 20 राष्ट्राध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीतल्या प्रगती मैदान कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यासाठी तयारीची जोरदार लगबग सुरु आहे. बऱ्यापैकी कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून सध्या कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे.
जी 20 शिखर परिषदेसाठी 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत शाळा, कॉलेजं, सरकारी कार्यालयं सगळं बंद असेल. संपूर्ण राजधानीचं लक्ष एकवटलं असेल ते फक्त एकाच कार्यक्रमावर, ते म्हणजे जी 20 शिखर परिषद. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी जी 20 शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचा व्यवस्थेवर ताण पडू नये यासाठी तीन दिवस संपूर्ण दिल्लीला सुट्टीच जाहीर करण्यात आली आहे. ज्या प्रगती मैदान कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तिथेही तयारीची जोरदार लगबग सुरू आहे.
काय-काय तयारी सुरू आहे दिल्लीत ?
जी 20 च्या या बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे स्वत: उपस्थित राहू शकणार नाहीत. काल त्यांनी आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचं पंतप्रधान मोदींना कळवलं आहे. पण इतर अनेक बड्या देशांचे राष्ट्रप्रमुख या बैठकीसाठी दिल्लीत असतील. त्यासाठी दिल्लीतल्या 35 पंचतारांकित हॉटेलमधल्या 3500 रुम्स बुक करण्यात आल्या आहेत.
कुठल्या राष्ट्राध्यक्षांचा कुठे मुक्काम ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जी20 शिखर परिषदेच्या निमित्तानं पहिल्यांदाच भारतभेटीवर असतील. त्यांचा मुक्काम दिल्लीतल्या आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये असेल. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ताज पॅलेस हॉटेलवर राहणार आहेत. ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे शांग्रिला तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युअल मॅक्रॉन हे क्लॅरिजिएस हॉटेलवर मुक्काम करतील. 20 देश असले तरी अधिकारी आणि इतर संस्था मिळून 36 ताफे 9 सप्टेंबरला निघणार आहेत. सर्वात मोठा ताफा अमेरिकेचा असेल, ज्यात 60 गाड्या असतील तर पाठोपाठ 45 गाड्यांचा ताफा असेल. जी 20 शिखर परिषदेसाठी भारतात येणारे 6 देश... अमेरिका, चीन, तुर्की, फ्रान्स, यूएई, आणि युरोपियन युनियन हे आपापल्या गाड्यांचा ताफा विमानानं भारतात घेऊन येणार आहेत. इतर राष्ट्रांसाठी गाड्या भारतातून उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यासाठी काही आलिशान गाड्या चंदीगढमधून मागवल्या जाणार आहेत. दरम्यान, 8 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान दिल्लीचा प्लॅन करत असाल तर काळजी पण घ्या. कारण या तीन दिवसांत जवळपास 160 देशांतर्गत विमानं रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीतल्या वाहतुकीबाबतही बरेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्यात व्हीव्हीआयपी भाग म्हणून ओळख असलेल्या सेंट्रल दिल्लीचा परिसर पूर्णपणे छावणीसारखा बंद असेल.