श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती
रिपोर्टर
19-08-2023 15:38:24
760
श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती
वदे नर्मदा तापी बाजीराव प्रतापी...
पारतंत्र्याच्या अंधःकारात पिचलेल्या जनतेला स्वातंत्र्याच्या सूर्य बनून धर्म संस्थापणेसाठी शिवछत्रपती एक युगपुरुष म्हणून अवतीर्ण झाले. जुलमी सुल्ताशाह्यांना धूळ चारून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असा राजा खरोखरच होणे नाही. शिवछत्रपतींच्या देहावसानानंतर शंभुछत्रपतींची अवघ्या ९ वर्षांची कारकीर्द ही झंझावाती होती, स्वराज्यावर कोसळणाऱ्या अनेक वादळांना त्यांनी तितक्याच ज्वलंतपणे परतून लावले, पण काळाने घाला घातला. औरंगजेबाने शंभुछत्रपतींना हालहाल करून क्रूरपणे त्यांची हत्या केली. स्वराज्याचा डोलारा पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी अगदी यथायोग्य अन प्रसंगी चिवट होऊन शत्रूविरोधात लढा दिला. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभुपुत्र थोरले शाहू महाराज कैदेतून सुटले आणि त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी पुनः व्यवस्थित करण्यासाठी सरदारांची जमवाजमव सुरू केली ज्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट हे देखील एक होते. बाळाजी विश्वनाथ भट यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर अनेक सरदारांना सातारच्या गादीशी जोडले. त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन शाहू छत्रपती महाराजांनी त्यांना 'पेशवा' पद बहाल केलं. त्यांनी पेशवे पदाची जबाबदारी अत्यंत योग्य प्रकारे हाताळून स्वराज्याची हरतर्हेने सेवा केली. बाळाजी विश्वनाथ भट यांच्या निधनानंतर पेशवेपदासाठी पेच निर्माण झाला पण बाळाजींच्या कर्तबगारीमुळे दरबारी लोकांच्या विरोधाला न जुमानता शाहू छत्रपती महाराजांनी बाळाजींचे सुपुत्र 'बाजीराव' यांना पेशवाईची वस्त्रे दिली.
बाजीराव पेशव्यांचा जन्म दिनांक १८ ऑगस्ट इ.स. १७०० रोजी झाला. लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, चपळता, शौर्य, साहसी वृत्ती त्यांच्या अंगी भिनलेली होती, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बाजीराव पांडवगडच्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झाले होते यावरून त्यांच्या लढाऊ बाण्याचा अंदाज येतो. वडील बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासह ते शाहू छत्रपती महाराजांच्या दरबारात देखील जात व दरबारी कार्यकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत होते. यावरून अल्पवयातच लष्करी रणनीती, राजकारण, मुत्सद्देगिरी या अनुभवांनी संपन्न झाले होते.
पेशवाईची वस्त्रे मिळताच त्यांनी खान्देशात पहिली मोहीम काढली ज्यात त्यांची फत्ते झाली. पुढे निजामाने मराठी मुलुखात हैदोस घालण्यास सुरुवात केल्यावर १५ डिसेंबर १७२० रोजी औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) येथे मराठे आणि निजामांमध्ये मोठे युद्ध होऊन त्यात निजामाचा पराभव झाला व निजाम आणि बाजीराव या उभयतांत भेट होऊन अटीप्रमाणे निजामाने मराठ्यांचा हस्तगत केलेला सर्व मुलुख परत केला. या विजयाने मराठी सैन्यात हुरूप आला.
त्यानंतर मोगल सेनापती दाऊदखानाने सोरटी सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाला हानी केल्यावर बाजीरावांनी त्याचा असा काही पराभव केला की त्याला रणांगणच नव्हे तर माळव्याच्या बाहेर हाकलले.
पुढे राऊंनी पांढऱ्या पायांच्या पोर्तुगीजांनाही आंग्र्यांच्या मदतीने जेरीस आणून तह करण्यास भाग पाडले. इकडे वारंवार ताकीद देऊनही निजाम कुरापती करतच होता, यावेळी तर निजामाने कोल्हापूरकर संभाजीराजेंना हाताशी धरून बाजीरावांवर चाल केली त्यावेळी बाजीरावांनी थेट त्याची राजधानी हैदराबादेवर (भागानगर) चालून गेले. अखेर पालखेडला बाजीरावांनी निजामाला पराभूत करत त्याच्या पूर्ण सैन्याला शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. व उभयतांमध्ये १६ कलमी तह झाला.
पुढेही निजामाने अनेकदा डोके वर काढले पण प्रत्येकवेळी बाजीरावांनी निजामावर शौर्याने आणि प्रसंगी चातुर्याने मात दिली.
राऊंचा दबदबा इतका वाढलेला होता की त्यांचा धाक निजाम, मोगल, जंजिरेकर हबशी, पोर्तुगीजांनाही राऊंचे नाव घेताच धडकी भरत असे, यासंदर्भातच १७३१ च्या एका पत्रात उत्तर फिरंगाणच एक अधिकारी गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉइसरॉयला म्हणतो की
"बाजीराव पेशवा म्हणजे शिवाजीचा वंशज प्रतिशिवाजीच आहे"
एका समकालीन पत्रात तर म्हटलय, "रायांचे पुण्यप्रताप ऐसे जाहले की आज हस्तिनापूरचे राज्य घेऊन स्वामींस (शाहू महाराजांस) देतील तरी समय अनुकूल आहे..!"
इतिहासकार सर जदुनाथ सरकार म्हणतात "अस्थिर झालेल्या मराठी राज्याचे स्वातंत्र्य बाजीरावांनी पक्के केले, आणि हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. शिवाजीराजांनी ‘महाराष्ट्रराज्याची’ निर्मिती केली, परंतू त्या राज्याला ‘बृहत्तर महाराष्ट्राचे’ रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला ही गोष्ट सामान्य नव्हे खासच."
थोरल्या बाजीरावांचे कौतुक करताना त्यांचाच एक समकालीन माणूस म्हणतो,
" स्वामी उभयेता पूर्णब्रह्म! या कलियुगामध्ये अवतारच आहेत. ऐसी कार्ये मनुष्यापासून व्हावी ऐसे नाही. तीर्थरूप राजश्री रायाच्या प्रतापे वसईचे आणि गोवेयाचे कार्य जाहले. अघटीत गोष्टी ज्या न होण्याच्या त्या जाल्या. तपस्वी आहेत त्यासच मात्र स्वामींची स्वरूपे कळली आहेत. इतर जनास जैसे श्रीकृष्ण मनुष्य दिसत होता! ते समई एक विदुर, एक अक्रूर आणि एक भीष्म यासच पूर्णब्रह्म ऐसा श्रीकृष्ण दिसत होता. तैसेच स्वामी योग्यास दिसतात. "
बाजीराव पेशव्यांवर शाहू छत्रपती महाराजांचा किती लोभ होता हे अनेक कागदपत्रांमधून आपल्याला दिसून येतं. इ.स. १६८९ ला रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मध्यंतरी बऱ्याचशा घटना घडल्या, स्वराज्यावर मुघलांचं वादळी सावट येऊन ठाकलेलं असताना मराठ्यांनी प्रसंगी महाराष्ट्राबाहेर राहून औरंगजेबाशी झुंज दिली हे आपण जाणतोच, पण शाहू छत्रपती महाराजांनी कार्यभार हाती घेतल्यानंतरही शिवछत्रपती आणि शंभुछत्रपतींच्या 'तख्ताचा गड' रायगड अजूनही मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. त्यावेळी शाहू छत्रपती महाराजांनी रायगड मोहीम आखली. इतिहासात पहिल्यांदाच बहुतांश मातब्बर सरदार या मोहिमेसाठी एकत्र झाले आणि त्यांनी जून १७३३ ला रायगड घेतला. ज्यामध्ये फत्तेसिंहराजे आणि बाजीराव पेशवे हे आघाडीवर होते.
एका पत्रात शाहू छत्रपती महाराज म्हणतात की "कोणास न जाहले ते कार्य चि. फत्तेसिंहबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे."
सर्व परकीय आघाड्यांवर मात देत पुण्यश्लोक शाहू छत्रपती महाराजांची इमानी तलवार २८ एप्रिल १७४० ला रावेरखेडी येथे नर्मदातीरी म्यान झाली.
।। वदे नर्मदा तापी, बाजीराव प्रतापी ।।
जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.