आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 व्यक्ती विशेष

बहिणाबाई चौधरी

रिपोर्टर   26-08-2023 15:31:53   962

बहिणाबाई चौधरी

यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी खानदेशातील  असोदे या गावामध्ये झाला. असोदे हे गाव जळगाव पासून ५-६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.आणि आईचे नाव भिमाई होते. 

बहिणाबाईंना एकूण सहा भावंडे होती. त्यात तीन बहिणी-तुळसा , अहिल्या आणि सीता. आणि तीन भाऊ – घना, घमा आणि गणा.

१८८०  काळ म्हणजेच भारतातील ब्रिटिश राजवटीचा कालखंड होय. या काळात भारतीय सुधारकांची दुहेरी लढाई नुकतीच सुरु झालेली. एकीकडे सामाजिक सुधारणेसाठी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा सुरु होता. तर दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी टकराव उडत होते. 

अश्या या संघर्षाच्या काळात बहिणाबाईंचा जन्म झळ. तोही एका शेतकरी कुटुंबामध्ये. तत्कालीन रीतीप्रमाणे बहिणाबाईंचे वडील उखाजी महाजन त्यांनी आपल्या मुलीचा -बहिणाबाईंचा विवाह जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी करून दिला. विवाहाच्या वेळी बहिणाबाईंचे वय फक्त १३ वर्षे होते. 

बहिणाबाईंचा संसार हा आधी एकत्र कुटुंब पद्धतीतीलच होता. मात्र काही घरगुती कलहामुळे त्यांचे कुटुंब विभक्त झाले. नव्या ठिकाणी नव्याने संसार उभा करण्याला यश येत असतांनाच नथुजी यांचे १९१० च्या काळात निधन झाले. त्यावेळी बहिणाबाईंच्या पदरी तीन लेकरे आणि थोडी जमीन या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बहिणाबाईंनी शेतीचा आसरा घेतला. विविध परंपरांनी बुरसटलेल्या तत्कालीन समाजात एक विधवा म्ह्णून जगतांना बहिणाबाईंना कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला असेल याचा तर आपण विचार न केलेलाच बरा. 

शेतातील आणि दैनंदिनची कामे करत असतांना मन रमवण्यासाठी प्रत्येकच काळात गीतांनी स्त्रियांना मोठा आधार दिला आहे. जात्यावरच्या ओव्या या त्याच प्रकारातील.बहीणाबाईंनीसुद्धा  या गीतांचाच आधार घेतला. त्यांच्या बहुतेक रचना ह्या अश्याच कुठले न कुठले काम करतांना त्यांच्या मुखावर अवतीर्ण झालेल्या आहेत. 

स्त्री जीवनाशी हिंदोळे घेणारे वेगवेगळे विषय हेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता यामध्ये पुन्हा पुन्हा आढळतांना आपल्याला दिसतील. सासर, माहेर, संसार, शेती, व्यक्तिचित्रे अश्याच विषयांना बहिणाबाईंनी हात घातलेला आहे.  कुठे कुठे त्यांची कविता उपरोधाने भारलेली जाणवते तर कुठे उपदेशाच्या कडू काढ्याने भारलेली. मुळात बहिणाबाई पूर्णतः निरक्षर.पण त्यांच्या कवितांची उंची हि मोठं मोठ्या पंडितांना चाट पाडणारी आहे.  त्यांच्या रचना ह्या त्यांचे पुत्र सोपानदेव आणि पुतण्या यांनी लिहून ठेवल्यामुळे आज आपल्यापर्यंत पोचत आहेत. 

खरे पाहता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आज आपल्याला वाचायला मिळाल्या नसत्या जर त्यांचे पुत्र आणि पुतण्या यांनी त्या लिहून ठेवल्या नसत्या. त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाची कथाही फार मजेशीर आहे. 

महाराष्ट्राला एक कवी म्हणून माहिती असलेले सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई यांचे पुत्र. बहिणाबाईंनी ३ डिसेंबर १९५१ ला जगाचा निरोप घेतला. त्यानंतर घराची आवरासावर करत असतांना सोपानदेव यांना एक वही सापडली. याच वहीमध्ये लहानपणी त्यांनी त्यांच्या आईने गुणगुणलेली गाणी लिहून ठेवलेली होती. ती वही मिळाल्यानंतर आईची आठवण म्हणून त्या कविता प्रकाशित करण्याच्या हेतूने सोपानदेव यांनीं आचार्य अत्रे यांची भेट घेतली. या कविता प्रकाशित करू कि करू नये असे विचारतांनाच त्यातील एक दोन कविता त्यांनी आचार्य अत्रेंना वाचायला दिल्या.  कविता वाचून झाल्यावर अत्रेंच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले “हे तर शुद्ध बावनकशी सोने आहे.हे महाराष्ट्रापासून लपवण्याचा आपल्याला काही हक्क नाही.” शेवटी १९५२ ला सुचित्रा प्रकाशनाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रकाशित केल्या.  सिंधुताई सपकाळ यांचं एक विधान आहे. मनाला फार चटका लावून जाणारं -” हा महाराष्ट्र आहे बाळांनो. येथे मोठं होण्यासाठी मरावं लागतं.” नेमकं तंतोतंत बहीणबाई चादरी यांच्या प्रकरणाला लागू पडतं  हे विधान.जीवनभर दारिद्राशी दोन हात करीत झुंजणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आज मराठी पाठ्यक्रमाचा भाग आहेत. 

 

मराठी चित्रपटांत गाणी प्रसिद्ध होण्यापासून ते आज महाराष्ट्रात एका  विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाह्यक्रमाचा भागच बनवला आहे.  माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत. हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.     

   बहिणाबाई चौधरी यांच्या कविता.....

 

 अरे संसार संसार 

 

 

अरे संसार संसार 

 

जसा तावा चुल्यावर

 

आधी हाताले चटके 

 

तवा  मियते भाकर 

 

 

 

करा संसार संसार 

 

खोटा कधीं म्हणूं नहीं 

 

राउळाच्या कयसाले 

 

लोटा कधीं  म्हणूं  नहीं 

 

 

 

अरे संसार संसार 

 

नही  रडनं कुढनं 

 

येडया, गयांतला हार 

 

म्हणूं नको रे लोढणं 

 

 

 

अरे संसार संसार 

 

खीरा येलावरचा तोड 

 

एक तोंडा मधी कडू 

 

बाकी अवघा लागे गोड 

 

 

 

अरे संसार संसार 

 

म्हणू नको रे भीलावा 

 

त्याले गोड भीमफूल 

 

मढी गोंडंब्याचा ठेवा 

 

 

 

 देशा  संसार संसार 

 

शेंग  वरतण  कांटे 

 

अरे, वरतून कांटे 

 

मधीं  चिक्ने  सागरगोटे 

 

 

 

ऐका  संसार संसार 

 

दोन्ही जीवाचा इचार 

 

देतो दुःखाले  होकार 

 

अन सुखाले नकार 

 

 

 

देखा संसार संसार 

 

दोन्ही जीवाचा सुधार 

 

कधी नगद उधार 

 

सुखादुखाचा बेपार 

 

 

 

अरे संसार संसार 

 

असा मोठा जादूगार 

 

माझ्या जीवाचा मंतर 

 

त्याच्या वरती मदार 

 

 

 

असा संसार संसार 

 

आधी देवाचा ईसार 

 

माझ्या दैवाचा जोजार 

 

मंग जीवाचा आधार !

 

 मन 

 

 

मन वढाय वढाय 

 

उभ्या पिकांतलं  ढोर 

 

किती हांकला हांकला 

 

फिरी येतं  पिकांवर 

 

 

 

मन मोकाट मोकाट 

 

त्याले ठायीं  ठायीं  वाटा 

 

जश्या वाऱ्यानं चालल्या 

 

पान्या वरल्यारे लाटा 

 

 

 

मन लहरी लहरी 

 

त्याले हातीं  धरे कोण? 

 

उंडारलं उंडारलं 

 

जसं  वारा  वाहादन 

 

 

 

मन जह्यरी जह्यरी 

 

याचं  न्यारं ते तंतर  

 

आरे इचू, साप बरा 

 

त्याले उतारे मंतर !

 

 

 

मन पांखरूं पांखरूं 

 

त्याची काय सांगूं  मात 

 

आता होतं  भुईवर 

 

गेलं गेलं आभायान्त 

 

 

 

मन चप्पय चप्पय 

 

त्याले नहीं  जरा धीर 

 

तठे  व्हयीसनी ईज 

 

आलं आलं धर्तीवर 

 

 

 

मन एवढं एवढं 

 

जसा खाकसचा दाना 

 

मन केवढं केवढं 

 

त्यांत आभाया  मायेना 

 

 

 

देवा, कास देलं  मन 

 

आसं नहीं  दुनियांत !

 

आसा कसा रे यवगी 

 

काय तुझी करामत !

 

 

 

देवा, आसं  कसं  रे मन 

 

आसं कसं  रे घडलं?

 

कुठे जागेपणी तुले 

 

आसं  सपन पडलं !

 

 

 

 

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता – लपे करमाची  रेखा 

 

 

लपे कारमाची  रेखा 

 

माझ्या कुकवाच्या खाली 

 

पुशीसनी गेलं कुकू 

 

रेखा उघडी पडली 

 

 

 

देवा तुझ्याबी घरचा

 

झरा धनाचा आटला 

 

घन  रेखाच्या चऱ्यानं 

 

तयहात रे फाटला 

 

 

 

बापा, नको मारूं  थापा 

 

असो खऱ्या असो खोट्या 

 

नहीं  नशीब नशीब 

 

तयहाताच्या रेघोट्या 

 

 

 

अरे, नशीब नशीब 

 

लागे  चक्कर पायाले 

 

नशिबाचे नऊ गिऱ्हे  

 

ते बी फिरत राह्यले 

 

 

 

राहो दोन लाल सुखी 

 

हेच देवाले मांगन 

 

त्यांत आलं रे नशीब 

 

काय सांगे पंचांगन 

 

 

 

नको नको रे जोतिषा  

 

नको हात माझा पाहू 

 

माझं दैव मले कये

 

माझ्या दारी नको येऊं !

 

 

 

 

 

 

 

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता –कशाला काय म्हणूं  नहीं ?

 

 

बिना कपाशीनं उले 

 

त्याले बोन्ड म्हणूं नहीं 

 

हरी नामाईना बोले 

 

त्याले तोंड म्हणूं नहीं 

 

 

 

नही वाऱ्यानं हाललं 

 

त्याले पान  म्हणूं  नहीं 

 

नाही ऐके  हरिनाम 

 

त्याले कान  म्हणूं  नहीं 

 

 

 

पाटा  येहेरींवाचून

 

त्याले मया म्हणूं नहीं 

 

नहीं  देवाचं दर्सन 

 

त्याले डोया म्हणूं  नहीं 

 

 

 

निजवते भुक्या पोटीं 

 

तिले रात म्हणूं नहीं 

 

आंखडला दानासाठी 

 

त्याले हात म्हणूं  नहीं 

 

 

 

ज्याच्या मधीं  नहीं  पानी 

 

त्याले हाय म्हणूं  नहीं 

 

धांवा ऐकून अडला 

 

त्याले पाय म्हणूं  नहीं 

 

 

 

येहेरींतून ये रीती 

 

तिले मोट म्हणूं  नहीं 

 

केली सोताची भरती 

 

त्याले पोट म्हणूं नहीं 

 

 

 

नहीं वळखला  कान्हा 

 

तिले गाय म्हणूं  नहीं 

 

जीले  नहीं फुटे पान्हा 

 

तिले माय म्हणूं  नहीं

 

 

 

अरे, वाटच्या  दोरीले 

 

कधी साप म्हणूं  नहीं

 

इके पोटच्या  पोरीले 

 

त्याले बाप म्हणूं  नहीं 

 

 

 

दुधावर आली बुरी 

 

तिले साय म्हणूं  नहीं 

 

जिची माया गेली सरी 

 

तिले माय म्हणूं  नहीं 

 

 

 

इमानाले इसरला 

 

त्याले नेक म्हणूं  नहीं 

 

जल्मदात्याले भोवला 

 

त्याले लेक म्हणूं  नहीं 

 

 

 

ज्याच्यामधीं नहीं भाव 

 

त्याले भक्ती म्हणूं  नहीं 

 

त्याच्यामधी नहीं चेव 

 

त्याले शक्ती म्हणूं  नहीं


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती