कारचालकाला धमकावत लुटले:
दोन सराईत गुन्हेगारांना अटक
नाशिक ( प्रतिनिधी ) : राज्यभरात गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्येदेखील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहेत. तेथे लोकांना लुटण्यासाठी चोरट्यांनी नवनवी शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. तेथे दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी एका कारचालकाशी भांडण करत त्याला लुटल्याचे समोर आले आहे. विशाल चाफळकर, अनिकेत गवळी असे या दोन संशयितांचे नाव आहे.
विशाल आणि अनिकेत या दोघांनी एका कारचालकाला धमकावत त्याला लुटल्याची माहिती मिळाली आहे. साहिल ठाकूर असे फिर्यादीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा कट लागला या कारणावरून विशाल आणि अनिकेत यांनी साहिल ठाकूर याच्याशी भांडण सुरू केले. हा वाद वाढतच गेला आणि त्या दोघांनी साहिलकडून रोख रक्कम आणि त्याची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली. एवढेच नव्हे तर आणखी पैसे दे नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकीही आरोपींनी त्याला दिली.
साहिला याने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जिथे गुन्हा घडला त्या आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि त्या दोघांनाही अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे समजते.